औरंगबाद : दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसरात असलेल्या जैन लेण्या पुरातत्व विभागाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा प्रकाशात आल्या आहेत. दुर्लक्षित असलेल्या या लेण्यांमुळे औरंगाबाद शहराच्या वैभवात भर पडली आहे. या जैन लेण्यांचे संवर्धन करण्यात यावे अशी मागणी इतिहास प्रेमी करत आहेत.
औरंगाबादमध्ये सध्या ब्रेक द चैन मोहिमेंतर्गत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व पर्यटन स्थळे बंद आहेत. यामुळे पुरातत्त्व विभागाने किल्ल्याची साफसफाई सुरू केली आहे. याचदरम्यान औरंगाबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या दौलताबाद येथील जैन लेण्या पुन्हा एकदा प्रकाशात आल्या आहेत. पुरातत्त्व विभागाने या लेण्यांच्या परिसरात स्वच्छता करून, रस्ता तयार केला आहे. दरम्यान इथे सात लेण्या आहेत, यातील एक लेणी सुस्थितीत असून, एका लेणीचे छत कोसळले आहे. तर उर्वरीत लेण्या या जमिनीखाली गेल्या आहेत.
यादव राजवटीतील लेण्या
इतिहास तज्ज्ञ दुलारी कुरेशी यांच्या मते या जैन लेण्या एक हजार वर्षांपूर्वी ११३७ मध्ये यादव राजवटीत कोरल्या असल्याचा आंदाज आहे. किल्ल्यावरचा हा भाग सात टाकी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. किल्ल्यावरील मेंढा तोफेच्या समोर रंगमहाल आहे. त्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर जंगलासारखी झुडपे वाढली आहेत. जैन लेण्यांकडे जाण्यासाठी असलेला रस्ता अनेक वर्षांपासून बंद होता. यामुळे या लेण्यांकडे पर्यटक जात नसत. मात्र या लेण्या पर्यटकांना खुल्या व्हाव्यात यासाठी पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी किल्ल्यावर साफसफाई मोहीम सुरू केली आहे. याठिकाणी जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता करण्याचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. यासाठी पुरातत्व विभागाचे दौलताबाद किल्ल्याचे संरक्षण सहाय्यक संजय रोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र घाटे, अशोक निंभोरे, सुखदेव नीळ, गौरख बनकर, मोहंमद इजाज, पंडित वाबळे, कुशीनाथ खोसरे, सिद्धार्थ कुमार हे कर्मचारी काम करत आहेत.
लेण्यांचे संवर्धन होणे गरजेचे
शहरासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या ऐतिहासिक जैण लेण्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाने या लेण्यांची डागडुजी करून लेण्यांची दुरुस्ती केली पाहिजे. तरच येणाऱ्या काळात नव्या पिढीला या लेण्या पाहण्यास मिळतील. तसेच या लेण्यांमुळे इतिहास विषयातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी नवा विषय मिळाला आहे. असं मत दुलारी कुरेशी यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - सचिन वाझेंचे सहकारी रियाजुद्दीन काझी यांना 16 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी