औरंगाबाद - व्हिडिओकॉन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक वेणूगोपाल धूत यांच्या अदालत रस्त्यावरील कार्यालयावर ईडीने (सक्तवसुली संचनालय) छापा मारला. शुक्रवारी सकाळी सर्व प्रथम पैठण रस्त्यावरील बंगल्याची झडती घेण्यात आली. त्यानंतर जालना रस्त्यावरील नेक्स्ट शोरूम येथील कार्यालयावर छापा मारला.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईबद्दल कुठलाही माहिती देण्यास नकार दिला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या संबंधित कर्ज प्रकरणामध्ये ईडीने त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा मारला. ईडीचे अधिकारी शुक्रवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यांनी धूत यांच्या पैठण रस्त्यावरील घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर जालना रस्त्यावरील नेक्स्ट शोरूम येथे असलेल्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली.
साधारणतः दोन दिवस ही झडती सुरू होती. काही दिवसांपूर्वी धूत यांच्या चितेगाव येथील कंपनीत सीबीआयच्या पथकाने तपासणी केली होती. त्यानंतर आता ईडीने तपासणी केली असल्याने धूत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.