औरंगाबाद - 'साहेब समदीकडं लॉकडाऊन लागलं. सरकारी नोकरदारांचे पगार सुरू आहेत. पण, आमच्या हातावर पोट असणाऱ्या लोकांचं काय? सरकारनं मदतीची घोषणा केली खरी मात्र, ते आमच्यापर्यंत पोहोचलीचं नाही. हाताला काम नाही, सरकारी मदतही नाही, सांगा आम्ही कसं जगायचं?' असा प्रश्न शहागंज येथील कामगार नाक्यावरील अशोक शेजुळ यांनी उपस्थित केला. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागल्याने कामगारांना काम मिळेनासे झाले आहे.
आठवड्यात एक दोन वेळेसचं मिळते काम -
शाहगंज येथे एसबीआय बँकेच्यासमोर असलेल्या कामगार नाक्यावर रोज तीनशे-चारशे मजूर कामाच्या शोधात येतात. पूर्वी या कामगारांना पाचशे रुपये रोज प्रमाणे दररोज काम मिळायचे. मात्र, आता कामं बंद असल्याने त्यांना रोजगार मिळत नाही. या कामगारांना कुठल्याच शासकीय योजनांचा लाभ देखील मिळत नसल्याचे ते सांगतात.
दारूची दुकानेही बंद करा -
आम्ही जालन्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या राजूर या गावात राहतो. मात्र, गावात काम मिळत नसल्याने आम्ही औरंगाबाद शहरात आलो. याठिकाणी तीन हजार रुपये भाड्याच्या घरात तीन मुलांसह राहतो. मात्र, नवरा व्यसनी असल्यामुळे तो घरात काहीच पैसे देत नाही. यामुळे मला मुले घरी सोडून कामावर यावे लागते. सरकारने देश बंद केला तशी दारूबंदी केली पाहिजे, अशी मागणी रेखा खैरे यांनी सरकारकडे केली आहे.
सांगा आम्ही घर कसे चालवायचे -
शहरातील शहागंज भागात असलेल्या कामगार नाका तसेच सिडको भागातील कामगार चौक व वाळुंज भागात कामगारांना कामासाठी वणवण फिरावे लागत आहे. आलेले काम देखील ठेकेदार पडून देत असल्यामुळे, पाचशे रुपयांचे काम शंभर ते दीडशे रुपयात करावे लागत असल्याचे कामगार सांगतात. कामगारांना पंधरा दिवसात दोन ते तीन वेळाच काम मिळत आहे. या तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवायचे, असा प्रश्न हे कामगार विचारत आहेत.
दहा रुपयांच्या पेंडंखजुरवर सोडतो रोजा -
रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात मुस्लिम धर्मामध्ये रोजे ठेवले जातात. रोजे सोडण्यासाठी फळे आवश्यक असतात. घरातून कामासाठी बाहेर पडतो तेव्हा काम मिळेल, अशी अपेक्षा असते. मात्र, दिवसभर थांबूनही काम मिळत नाही. यामुळे हताश होऊन घरी जावे लागते. घरी गेल्यानंतर लेकरे-बायको मोठ्या अपेक्षेने हाताकडे पाहतात. मात्र, कामच मिळाले नाही तर घरी काय नेणार. यामुळे लेकरा बाळांसह दहा रुपयाच्या पेंडखजुरवर रोजा सोडावे लागत असल्याचे काही कामगार सांगतात.