औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुष्काळ दुर्लक्षित होत चालला आहे. निवडणूक प्रचारात दुष्काळाचा मुद्दा मागे पडत असल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रशासन देखील उपाय करताना कमी पडत असल्याची खंत शेतकऱ्यांना आहे.
मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे. पिण्यासाठी पाणी नाही आणि जनावरांसाठी चारा नाही. अशात टँकरने पाणी दिले जात असले तरी प्रत्यक्षात गावापर्यंत १५-१५ दिवस टँकर पोहचत नसल्याचे चित्र आहे. चारा नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चार छावणी सुरू करण्याची मागणी होत असली तरी प्रशासन चारा छावणी सुरू करण्यासाठी परवानगी देत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळत आहे. सत्ताधारी असो की, विरोधी पक्ष एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक, अभिनंदन वर्धमान यांची सुटका, इतकेच नाही तर एकमेकांची घराणे काढत प्रचार केला जात आहे. मात्र, राज्यातील दुष्काळावर कोणताही पक्ष बोलायला तयार नाही. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. दर दोन ते तीन वर्षांनी दुष्काळ मराठवाड्यात डोकावत असला तरी यावर्षीची परिस्थिती गंभीर असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
जनावरांसाठी चारा विकत आणायला शेतकऱ्यांच्या खिशात पैसे नाहीत, अशी स्थिती असताना राजकीय नेते प्रचारात इतके व्यग्र आहेत की, दुष्काळापेक्षा नेत्यांना निवडणूक जास्त महत्त्वाची असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुका येतील जातील. मात्र, दुष्काळी उपाययोजनांकडे लक्ष द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत.