औरंगाबाद - कोरोनाच्या महामारीत डॉक्टरांनी दिलेले योगदान सर्वात महत्वाचे ठरले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार तर करतच आहे. मात्र, अंत्यविधी करायला कोणीही नसलेल्या लोकांवर विधिवत अंत्यविधी करण्याचे कामही डॉक्टरांनी केल्याचे पाहायला मिळाले. हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करायला कोणीही पुढे न आल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
वाळुज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय महादेव दादा नंनावरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधीच त्यांच्या दोनही मुलांना कोरोनाची लागण झाल्याने त्यामुळे अंत्यविधी करण्यास कुटुंबातील कोणीही सदस्य नव्हते. महादेव दादा नंनावरे यांची दोन्ही मुले खाजगी कंपनीमध्ये काम करतात. कंपनीमध्ये रुजू होण्यासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र घेण्यासाठी दोघांनी कोरोना चाचणी केली.परंतु दुर्दैवाने दोघेही पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच घरातील सर्वांची चाचणी करण्यात येणार होती परंतु त्याअगोदरच हृदयविकाराच्या झटक्याने नंनावरे यांचे निधन झाले. घरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने शेजाऱ्यांनीही सुरक्षितपणे नियम पाळत मदत केली. मात्र अंत्यविधी करणार कोण हा प्रश्न होता. त्यात परिसरातील डॉ संतोष कुलकर्णी यांनी रुग्णालयातील सहकाऱ्यांच्या मदतीने रांजणगाव शेनपुंजी येथील स्मशानभूमीमध्ये नंनावरे यांचा अंत्यसंस्कार केले. तसेच अशा संकटाच्या काळात सर्वांनी सोबत येऊन एकमेकांचे दुःख समजून मदत करा असे आवाहन डॉ.संतोष कुलकर्णी यांनी केले.