औरंगाबाद- कोरोना काळत रुग्णांची लूट होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी लावलेल्या उपचार शुल्कामध्ये जवळपास 24 लाखांची तफावत आढळून आली आहे. 409 रुग्णांच्या बिलांची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या ऑडिटरने केली यावेळी हा प्रकार समोर आला.
कोरोनाच्या संकटात खाजगी रुग्णालयांमार्फत जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कोरोनावर उपचार होत असलेल्या रुग्णालयात बिल ऑडिटर मार्फत बिलांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार पहिल्या महिन्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 409 रुग्णांचे बिलं तपासली. त्यामध्ये शासनाने दिलेल्या बिलांपेक्षा 24 लाखांची अधिकची बिलं लावल्याचे समोर आले. त्यानुसार त्यामध्ये दुरुस्ती करुन घेण्यात आल्याने सर्वसामान्यांचे 24 लाख रुपये वाचले आहेत. मात्र यामध्ये काही प्रमाणात रुग्णांना देण्यात आलेली महागडी औषधी आणि इतर तपासणी यांमुळे थोडाफार फरक पडू शकतो, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.
मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना, देण्यात आलेले बिल शासकीय ऑडिटरने तपासले आहे का? हे तपासून घ्यावे. आणि काही तक्रारी असल्यास आमचे एक मदत केंद्र खाजगी रुग्णालयात असेल तिथे आपल्या तक्रारी करू शकता त्या तापसल्या जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.