औरंगाबाद : मृत प्रेमी युगुलाची ओळख पटल्यावर पोलिसांनी दोघांच्या पालकांना याबाबत कळविले. मात्र, दोन दिवस उलटूनही पालकांनी मृतदेह ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे दोघांचे मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. 17 जानेवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सावंगी परिसरातील समृध्दी महामार्गावर असीम उर्फ बुच्चन अब्बास (वय 20 वर्षे) आणि असिका मो. कौसर (वय 14 वर्षे, दोघेही रा. दिल्ली) पायी जात होते. दरम्यान सावंगी पुलाजवळ तामिळनाडूच्या मालवाहू ट्रकने दोघांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी दोघांची ओळख पटविली असता दोघेही दिल्ली राज्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यापुढे पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली.
दिल्ली पोलिसांनी दिली माहिती : प्रकरणाची नोंद झाल्यावर फुलंब्री पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असता दोघेही घरातून पळून आल्याची माहिती समोर आली. तशी नोंद दिल्ली पोलिसात असल्याची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी दिली. या नंतर दिल्ली पोलिसांच्या मदतीने दोघांच्या पालकांचा शोध घेत त्यांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. मात्र, घटनेला दोन दिवस उलटले असताना देखील मृताचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेले नाहीत.
ही प्रश्न अनुत्तरीत : या प्रकरणी पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे. तर दोघेही दिल्लीहून पळून आल्यावर औरंगाबाद मध्ये नेमके कुणाकडे आले होते? दोघे पायी महामार्गावर कसे गेले, काय करीत होते? ते कुठे चालले होते हे स्पष्ट झालेले नाही. दोघांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला की मग दोघांनी आत्महत्या केली. याबाबत देखील शंका व्यक्त केली जात आहे. तर मुलांचा मृत्यू होऊनही दोघांचे पालक अद्याप त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी का आले नाही ? हा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे.
हेही वाचा : Thane Crime : दोन ज्वेलर्स दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी केले लाखोंचे दागिने लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद