औरंगाबाद - खुलताबाद तालुक्यातील खर्डी गावातील भालकवाडी शेतवस्तीवर एका पाच वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून आराध्या गोकुळ हिवर्डे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
हेही वाचा - 'दलित आणि मुस्लिम समाजाने वंचित आघाडीच्या पाठिशी ठाम रहावे'
शनिवारी मध्यरात्री आराध्या शेतातल्या घरात जमिनीवर झोपलेली होती. यावेळी आराध्या अचानक ओरडल्याने तिचे आई-वडील झोपेतून जागे झाले. मात्र, वीज पुरवठा बंद असल्याने चिमुकली का रडत आहे, हे घरच्यांच्या लक्षात आले नाही. यानंतर घरात उजेड केल्यावर आराध्याने हाताला आग होत असल्याचे सांगितले. घरच्यांनी अंथरुनाची पाहणी केली असता, एक सर्प त्यांना त्याठिकाणी दिसला. यानंतर नातेवाईकांनी आराध्याला तातडीने रुग्णालयात हलविले. दरम्यान, शनिवारपासून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान आराध्याचा मृत्यू झाला.
आराध्याच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - औरंगाबाद पालिकेच्या स्थायी समीतीची सोमवारी सभा; विधानसभेच्या तोंडावर विविध प्रस्ताव मंजुरीची शक्यता