वैजापूर (औरंगाबाद ) - नात्यातील एका महिलेला मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. (Shivsena MLA Ramesh Bornare) तर, बोरणारे यांच्यावर सुडबुद्धीने व राजकीय दबावाखाली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे गुरुवारी (दि. 17 मार्च)रोजी वैजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचला. त्यांनतर उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांना निवेदन देण्यात आले.
राजकीय दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप
मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचताच शिवसेना नेत्यांनी, कौटुंबिक वादाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्ते करीत असून, सूडबुद्धीने व राजकीय दबावाखाली आमदार बोरणारे यांच्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आपल्या भाषणातून केला. तसेच, बोरणारे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द न झाल्यास शनिवारी वैजापूर शहर बंदचा इशाराही यावेळी शिवसेनेतर्फे देण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
एका कार्यक्रमासाठी वैजापूरात आले असताना आमदार बोरनारे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत आमदारांच्या नात्यातील एका महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण आपला विनयभंग झाला असल्याचा आरोपही या महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पुरवणी जवाब नोंदवत आता आमदार बोरनारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात तक्रार
जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur MLA) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरून शिवसेना आमदाराकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याप्रकरणी वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे (Shivsena MLA Ramesh Bornare) यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
हेही वाचा - भाजपच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे शिवसेना आमदाराकडून मारहाण; महिलेचा आरोप