छत्रपती संभाजीनगर : आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान विकसित होत आहे. प्रगतशील जगात सोशल मीडियाचा वापर सर्रास केला जातो. यात वैयक्तिक माहितीसह मनोरंजन करणारा मजकूर अनेक वेळा टाकला जातो. मात्र, यात महिलांमध्ये फोटो (सेल्फी) काढून अपलोड करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, त्यांची हीच सवय त्यांना नैराश्यात ढकलत असल्याचा एका अहवालातून उघड झाले आहे. अनेक वेळा सेल्फी काढल्यावर त्याची तुलना इतरांसोबत केली जाते. आपल्यापेक्षा इतर कोणाचा चांगला फोटो असला, तर आपण तसे का नाही? असा विचार महिलांच्या डोक्यात घोंगावू लागतो. त्यामुळे लक्ष विचलित होऊन मानसिक ताण वाढल्याचा अनुभव महिलांना येत असतो.
फिल्टर लावल्याने निराशा वाढते : मोबाईलमधील तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. त्यात वापरण्यात आलेल्या कॅमेऱ्याचे वेगवेगळे फीचर्स तरुणांना आकर्षित करतात. मोबाईल कॅमेऱ्यात काढलेला फोटो, त्याला वेगवेगळे फिल्टर लावून बदलणे शक्य होते. त्यामुळे आपण कसे चांगले दिसू याकडे आजच्या तरुणाईच लक्ष असते. विशेषतः मुली फोटो काढल्यावर त्याला वेगवेगळे फिल्टर वापरून, आपण किती सुंदर आहोत हे भासवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे असताना आपण प्रत्यक्षात असे का नाही? असा विचार त्यांच्या मनात फिरत असतो. त्यात आपल्यासोबतच असलेल्या परिचित व्यक्तीचे फोटो पाहून त्याबाबतदेखील मोठ्या प्रमाणात तुलना केली जाते. आधीच महिलांमध्ये कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींचा ताण असतो, त्यात मोबाईल फोटो आणि त्यासाठी वापरण्यात लावलेले फिल्टर, यामुळे ताण येण्यास भर पडते. मुलगी असली तर ती सुंदरच असते हे संकल्पना घातक असल्याचे, मानसोपचार तज्ज्ञ मोनाली देशपांडे यांनी सांगितले.
सोशल मीडिया सांभाळून हाताळावा : आजच्या युगात व्यक्तीचा अर्धा वेळ सोशल मीडियावर घालवला जातो. त्यात समाज माध्यमे दिवसेंदिवस आपल्या मनावर ताबा मिळवत असल्याची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. विशेषतः महिलांमध्ये या बाबींचा सखोल परिणाम होत असल्याचे काही अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर सोशल मीडिया सांभाळून हाताळायला हवा, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोनाली देशपांडे यांनी व्यक्त केले. समाज माध्यम ही माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी उपयुक्त असतात. इतकेच नाही, तर संवाद साधण्यासाठीदेखील हे उत्तम साधन आहे. मात्र, त्यात कशा पद्धतीने आपण आपले मानसिक आरोग्य सांभाळू शकतो हेदेखील बघणे गरजेचे आहे. त्यामुळे सोशल मीडिया जर काही ठराविक बाबींसाठी वापरला गेला, तर आपल्यासाठी चांगले असेल असे मत डॉ. मोनाली देशपांडे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : Karan Johar old tweet : जेव्हा करण जोहरने प्रियांका चोप्राचे नाव न घेता म्हटले होते, 'कणाहिन आणि लंगडी'