औरंगाबाद - मुंबईहून बाळंतपणासाठी आलेल्या कोरोनाग्रस्त महिलेची उपचार सुरू असतानाच प्रसूती दुपारी झाली असून महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीचे वजन जवळपास तीन किलो आहे. तसेच मुलीची आणि आईची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संबंधित महिला मुंबईची रहिवासी आहे. ती प्रसूतीसाठी पोलिसांची परवानगी घेऊन 10 एप्रिलला औरंगाबादला आली होती. शहरात आल्यावर तपासणीत महिलेला आणि तिच्या 17 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी सिझेरियन करून महिलेची प्रसूती करण्यात आली.
महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर चिमुरडीला तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. तिची प्रकृती उत्तम असून सध्यातरी कोरोनाची कुठलेच लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र, खबरदारीचे उपाय म्हणून बाळाची तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. ही महिला कोरोनाबाधित असल्याने या महिलेवर उपचार सुरू होते. विशेष म्हणजे, कोरोनाबाधितांसाठी जे विशेष रुग्णालय सुरू करण्यात आले, त्या जिल्हा सामान्य रुग्णालयातच ही प्रसूती झाली आहे. तिला कोरोनाची बाधा झाली तेव्हाच गर्भधारणेला ९ महिने ९ दिवस पूर्ण झाल्याचे समोर आले होते. अशात डॉक्टरांनी तिची सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महिलेने सुरुवातीला परवानगी दिली नव्हती. मात्र, शनिवारी सकाळी महिलेने परवानगी दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयात शनिवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी या मातेने एका मुलीला जन्म दिला.