औरंगाबाद- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9 ने वाढली आहे त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 291 झाली आहे. बाधित रुग्णांमध्ये पत्रकार आणि त्याच्या आईचा समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
एका वृत्तपत्रातील पत्रकाराला गेल्या दोन दिवसांपासून ताप आला असल्याने त्याने आपला आणि आईचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पंचशील दरवाजा, किलेअर्क 1, सावित्री नगर, चिकलठाणा 1, देवळाई 1, पुंडलिक नगर 2, नंदनवन कॉलनी 1, जय भीमनगर 3 या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे, असे घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. औरंगाबादची रुग्णसंख्या 291 वर गेली आहे.
रविवारी रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित मृतांची संख्या 10 वर गेली आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत. बाजार पेठेत गर्दी होऊ नये याकरिता एक दिवसाआड पाच तासांसाठी अत्यावश्यक गोष्टी विकत घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.