औरंगाबाद- शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील चिंताजनक बनत चालले आहे. मध्यरात्री कोरोनाबाधित 80 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 14 वर गेला आहे. मागील आठ दिवसात हा पाचवा मृत्यू आहे.
80 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री 1.10 वाजता मृत्यू झाला, त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रविवारी कृत्रिम श्वास देण्यात येत होता, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
ताप, सर्दी, खोकला व दम लागणे अशी लक्षणे असल्याने 80 वर्षीय वृद्धाला 8 मे रोजी घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. 9 मे रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांना जास्त दम लागत असल्याने व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालल्याने रविवारी त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. त्यांचे वय जास्त असल्याने व त्यांना बॉयलॅटरल निमोनिया विथ ऍक्युट रिस्पेरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ड्यु टू कोरोना झाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री 1.10 वाजता मृत्यू झाला. औरंगाबादमधील कोरोनामुळे मृतांची संख्या आता 14 झाली आहे. ग्रामीण भागात पुन्हा नव्याने रुग्ण आढळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.