औरंगाबाद - आपल्या कोरोनामुक्त झालेल्या आईला घेण्यास आलेल्या मुलाला आईचा मृतदेह घेऊन घरी यावं लागल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात घडली. विशेष म्हणजे, आईनेच मुलाला फोन करून घ्यायला ये असे सांगितले होते.
बायजीपुरा येथील कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. कुटुंबातील 54 वर्षीय महिलेला संसर्ग झाल्याने जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास या महिलेने आपल्या मुलाला आपल्याला घरी सोडणार असून घ्यायला ये असा फोन केला होता.
महिलेचा फोन आल्यावर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. तिच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. महिलेचा मुलगा जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आणि आईला शोधू लागला. डॉक्टरांना आईबाबत माहिती विचारली असता त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काही वेळातच महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. कोरोनामुक्त झाल्याचा आनंद झालेल्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला. महिलेला रात्री घरी सोडण्यात येणार नव्हते. बाधित महिलेला मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता. सायंकाळी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
महिलेच्या पतीचे 13 दिवसांपूर्वीच निधन झाले होते. 3 जुलै रोजी त्यांची प्रकृती बिघडली होती. 4 जुलै रोजी उपचार सुरू असताना घाटी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनतर त्यांच्यावर कोरोनाबाधित संशयित म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांची पत्नी आणि नातवांना लागण झाली होती. गुरुवारी तेराव्याचा कार्यक्रम झाल्यावर त्यांच्या मुलाला महिलेने फोन करून घ्यायला बोलावलं होतं. आई घरी येणार म्हणून स्वागतासाठी मुलांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, स्वागत करण्याऐवजी आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मुलांवर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.