औरंगाबाद - गेल्या 3 महिन्यांपासून राज्यात सार्वजनिक कार्यक्रम, सोहळे घेण्यास बंदी घालण्यात आल्याने मंगल कार्यालय चालक अडचणीत आले आहेत. नियम व अटींच्या आधारे मंगल कार्यालय आणि लॉन्सवर विवाह सोहळे घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी औरंगाबादमधील व्यावसायिकांनी केली आहे.
राज्य सरकारने विवाह सोहळ्यासाठी 50 लोकांची परवानगी दिली आहे. घरासमोर किंवा देवळातही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी नियमांचे पालन होईलच, याची शास्वती नाही. त्यामुळे मंगलकार्यालयात सर्व नियम पाळणे शक्य होऊ शकते. मंगल कार्यालय चालक त्याच्यावर नियंत्रण करू शकतात. त्यामुळे ही परवानगी मिळावी, अशी मागणी मंगल कार्यालय चालकांनी केली आहे.
एप्रिल ते जून या काळामध्ये मंगल कार्यालयाचा व्यवसाय करण्याचा खरा काळ असतो. मात्र, याच काळात कोरोनाचा संसर्ग भारतात आला आणि त्यामुळे मंगल कार्यालयात कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली. ऐन लग्नसराईत होणारा व्यवसाय बुडाल्याने मंगल कार्यालय चालक अडचणीत सापडले आहेत. मात्र, आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात येत आहेत. विवाह सोहळ्यासाठी 50 लोकांसाठी परवानगी देण्यात आली आहे. हे सोहळे घरासमोर किंवा मंदिरात करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तिथे सोशल डिस्टन्स, हँडवॉश, सॅनिटायझर हे नियम पाळले जातील का? याबाबत शंका आहे. त्यामुळे मंगल कार्यालयात कार्यक्रमास परवानगी देण्यात आली तर सर्व नियमांचे पालन केले जाऊ शकते.
सिडको भागातील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात एक डेमोदेखील तयार करण्यात आला आहे. समारंभासाठी आलेल्या व्यक्तीसाठी प्रवेश द्वारालाच हँडवॉश आणि सॅनिटायझर वापरण्याची सक्ती करण्यात येईल. मंगल कार्यालयात आल्यावर पाहिले त्या व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग आणि ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येईल. त्यानंतर सोशल डिस्टन्सचे पालन करून विवाह सोहळ्याला आलेल्या लोकांना बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आली. ज्यामध्ये वधू - वरांचे आसन आणि उर्वरित व्यक्तींसाठी सोशल डिस्टन्सवर आसन व्यवस्था असेल. लग्नसोहळा पार पडल्यावर जेवण वाढण्यासाठी मास्क आणि चेऱ्यावर सुरक्षा कवच असलेले कार्यालयातील कर्मचारी जेवण वाढतील. त्याचबरोबर जेवण करण्यासाठी एक टेबल आणि त्यावर 3 जणांनाच बसण्याची सोय असेल, अशी व्यवस्था करण्यात येऊ शकते. अशा पद्धतीचा डेमो तयार करण्यात आला आहे. या पद्धतीचा वापर केला तर सुरक्षीतपणे विवाह सोहळे पार पडू शकतात, त्यामुळे मंगलकार्यालय किंवा लॉन्स सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मंगल कार्यालय असोसिएशनतर्फे कुलस्वामिनी मंगल कार्यालयाचे चालक विलास कोरडे यांनी केली.