औरंगाबाद - महाविकास आघाडीच्या रूपाने राज्यात नवीन समीकरण उदयास आले आहे. परंतू हे समीकरण मराठवाड्यासाठी नवीन नाही. अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला बाजूला ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. सुरुवातीचे अडीच वर्ष शिवसेनेला अध्यक्ष पद दिल्यानंतर आता काँग्रेसने अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राज्यातील सद्यस्थिती पाहता शिवसेना आघाडीसोबतच राहणार हे नक्की झाले आहे. तत्कालीन काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचे पाऊल उचलले होते. आता अब्दुल सत्तारच शिवसेनेत दाखल झाले असल्याने त्यांचे जिल्हा परिषद समर्थकही शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा भ्रम निरास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - मी केलेलं मतदान रद्द करा; तरुणीचं निवडणूक आयोगाला पत्र
शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळावा अशी अपेक्षा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आहे. शिवसेनेने काँग्रेसला दिलेला शब्द पळाला नाही तर, जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिवसेना काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करून देईल, अशी अपेक्षा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी व्यक्त केली आहे.