औरंगाबाद - लॉकडाऊनच्या काळात घरगुती वीजबील माफ करण्याची मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागातर्फे करण्यात आली आहे. तीन महिन्यांचे वीज बील माफ करण्याबाबतचे पत्रक ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देण्यात आले आहे.
गेल्या एका महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांच्या घरात दोन वेळची चूल पेटणे अवघड झाले असल्याने अनेकांना वीजबिल भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे तीन महिन्यांचे 100 युनिटपर्यंतचे वीजबील माफ करण्याची मागणी काँग्रेस अनुसूचित जमाती विभागाचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनचा काळ वाढत आहे. जसजसा काळ वाढत आहे तस सर्वसामान्यांच्या समस्या वाढत आहे.
घरात राहत असल्याने अनेकांचे रोजंदारीचे स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे दोन वेळचे पोट भरणे अवघड झाले असताना नागरिकांना दोनवेळचे अन्न मिळवणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत अनेकांना वीजेचे बील भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे बँकेने ज्याप्रमाणे तीन महिन्याचे कर्जाचे हप्ते स्थगित केले. त्याप्रमाणे ऊर्जा विभागाने तीन महिन्यांचे 100 युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जमात विभागातर्फे करण्यात आले आहे.
विभागाचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना त्याबाबत पत्र पाठवले आहे. राज्य सरकार कोरोनाच्या या काळात योग्य पावले उचलत आहे. आमच्या मागणीचा विचार होऊन ती मान्य होईल असा विश्वास असल्याचे, डॉ. जितेंद्र देहाडे यांनी सांगितले.