औरंगाबाद - बसैय्ये नगर येथील वादग्रस्त प्लॉटच्या मालकी हक्काबाबत नोटीस पाठविल्यामुळे दोघांनी मंगळवारी (ता.19) महापालिकेच्या अतिक्रमण विभागात गोंधळ घातला. याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी या पिता-पुत्राला ताब्यात घेतले.
एमजीएम ते जुना मोंढ्यापर्यंतच्या डीपी रोडचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या रोडवरील विद्युत पोल हटवण्यास बसैय्ये परिवाराकडून विरोध आहे. अशातच माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी पालिकेकडे संजय बसैय्ये यांच्या एका प्लॉटविषयी तक्रार केली. यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस संबंधितांना बजावली होती.
हेही वाचा-दौंडमध्ये किरकोळ कारणावरून ऊस तोडणी मजुराचा खून
पिता पुत्रांवर गुन्हा दाखल...
सिटीचौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पालिकेचे इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये व आर.एस. राचतवार यांच्यासमवेत मंगळवारी अतिक्रमण विभाग कार्यालयात प्रशासकीय कामकाजाबाबत चर्चा करत होते. साडेअकराच्या सुमारास संजय बसैय्ये व स्वप्नील बसैय्ये हे अतिक्रमण विभागत आले. बसैय्ये पिता-पुत्रांनी इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. या प्रकरणी माहिती मिळताच सिटीचौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोंधळ घालणाऱ्या पिता-पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.