औरंगाबाद - देशामध्ये औरंगाबाद शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे उद्योग आणि पर्यटन या शहराच्या जमेच्या बाजू असल्याने डीएमआयसीचा एकत्रित मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्या असून इटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर लवकरात लवकर सुरू करू, असे आश्वासन निती मुख्य कार्यकारी अधिकारी आयोगाचे अमिताभ कांत यांनी दिले आहे. त्यासाठी लागणारी जमीन राज्य सरकारने द्यावी, तसेच उर्वरीत खर्च केंद्र सरकारतर्फे करण्यात येईल, असेही त्यांंनी सांगितले.
शेंद्रा औद्योगिक वसाहतीची केली पाहणी -
शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या सभागृहात आज दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या ऑरिक सिटी (शेंद्रा-बिडकीन) आणि दिघी पोर्ट औदयोगिक क्षेत्र विकासाचा अमिताभ कांत यांनी सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला डिएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनंबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते आदी उपस्थित होते.
'ऑरिक'मध्ये उद्योगांना मिळणार सुविधा -
'ऑरिक सिटी'मध्ये उद्योगांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे आगामी काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगांची भर पडणार आहे. त्यामुळे औरंगाबाद व परिसरातील औद्योगिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. याशिवाय नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे विकासाला अधिक चालना मिळेल. औरंगाबादच्या विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानांची वाहतूक सुरु होईल. जेणेकरुन उदयोगांच्या विकासाबरोबर येथील पर्यटनालाही चालना मिळेल. तसेच औरंगाबाद शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक वसाहत केंद्र होण्यास नक्कीच मदत होणार आहे. या विकासात्मक बदलासाठी निती आयोग निश्चितच सहकार्य करेल, असे अमिताभ कांत यांनी सांगितले.
हेही वाचा - हुश्श!मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट कमी होऊन ४.४० टक्के!