औरंगाबाद - शहरासाठी दोन बस स्थानक असून या दोन्ही बसस्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, परिवहन विभागातर्फे करण्यात आलेलं नियोजन प्रवाशांनाच खर्चात टाकणारे ठरत आहे. कारण खासगी बसेसना दिवसाच्या वेळी शहरात परवानगी नाही. त्यामुळे शहाराबाहेर असलेल्या खासगी बस थांब्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना दुसऱ्या वाहनांने जास्तीचे खर्च करून तेेथे पोहोचावे लागते.
अशी आहे परिवहन व्यवस्था-
परिवहन मंडळाची शहरासाठी दोन बसस्थानके आहेत. सर्वात जून असलेले मध्यवर्ती बस स्थानक जे शहराच्या मध्यभागी आहे. या स्थानकात प्रवाशांची नेहमी गर्दी असते. तर दुसरे बस स्थानक हे सिडको भागात आहे. तर शहरात खासगी बस देखील आहेत. मात्र, त्यांना दिवसा शहरात येण्यास परवानगी नसल्याने सर्व खासगी बस या शहरातील शहानूर मिया दर्गा परिसरात उभ्या केल्या जातात आणि तेथूनच मार्गस्थ होतात.
प्रवाशांची गैरसोय-
नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी फक्त मध्यवर्ती बस स्थानकातच बस उपलब्ध होतात. त्यामुळे शहरातील सातारा परिसर, हर्सूल परिसर, हडको सिडको, चिकालाठाणा, मुकुंदवाडी, देवळाई, बीड बायपास, शिवाजीनगर गारखेडा परिसरातील नागरिकांची मध्यवर्ती बस स्थानकात जाण्यासाठी गैरसोय होते. जालन्याला जाण्यासाठी लागणारी बस ही सिडको बस स्थानक येथून लागते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना तास भर अगोदरच घरातून निघावे लागते.
रिक्षा चालकांकडून लूट-
मराठवाड्याची राजधानी व मोठी औद्योगिक वसाहत असल्याने उदरनिर्वाहासाठी बाहेरगावाहून येणाऱ्याची संख्या अधिक आहे. यामुळे शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. परिणामी शहराच्या मध्यवर्ती भागापासून बऱ्याच अंतरावर नव्याने नागरी वसाहती, नगरे, कॉलनी झाल्या आहेत. मात्र, या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बस्थानकात जाण्यासाठी खासगी वाहन हाच एक पर्याय आहे. यामुळे रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक करून लूट केली जाते. रिक्षाचालक अवाच्या सव्वा भाडे घेत असल्याच्या तक्रारी प्रवासी करतात.
शहराच्या मध्यभागी राहणाऱ्या प्रवाशांना जालन्याला जायचे असल्यास बस स्थानकावर जाण्यासाठी शहरातच प्रवासासाठी 70 रुपये एवढा खर्च येतो. कधी कधी रिक्षावाले जास्तीचे भाडे आकारतात, जेवढा खर्च जालन्याला जायला लागतो, तेवढा खर्च शहरात बस्थानकापर्यंत पोहचण्यासाठी करावा लागत असल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली.