छत्रपती संभाजीनगर Child Death : मुरुम उत्खनन करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वाळूज परिसरात उघडकीस आलीय. चैताली राहुल देशमुख आणि समर्थ राहुल देशमुख अशी चिमुकल्यांची नावं आहेत. या घटनेमुळं वाळूज परिसरात शोककळा पसरली आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर खड्डा खोदणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शाळेतून आल्यावर गेले होते खेळायला : चैताली आणि समर्थ हे बहीण भाऊ वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज नगरातील स्वामी विवेकानंद शाळेत शिक्षण घेत होते. चैताली चौथीत तर लहान भाऊ समर्थ हा दुसरीत शिकत होता. शुक्रवारी दुपारी दोघंही शाळेतून घरी आल्यावर ते खेळण्यासाठी इतर मुलांसोबत बजाजनगर इथल्या मोकळ्या जागेवर गेले होते. मात्र, त्या ठिकाणी अनधिकृतरित्या मुरुम काढण्यासाठी दहा बाय बाराचा खोल खड्डा करण्यात आला होता. त्यात पाणी जमा झालेलं होतं. खेळताना चैताली आणि समर्थ दोघंही त्या खड्ड्यातील पाण्यात पडले. ते बुडत असताना त्यांच्यासोबत असलेल्या एका आठ वर्षीय चिमुकल्यानं मदतीसाठी आरडाओरड सुरू केला. तिथं एक व्यक्ती मदतीसाठी पोहोचली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्यानं त्यांनी इतरांना आवाज देऊन बोलावलं. यानंतर पाण्यात पडलेल्या चैताली आणि समर्थ यांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना घाटी रुग्णालयात नेलं असता वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी नोंद केली पण : घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्या चैताली आणि समर्थ यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं. दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असली तरी, मात्र हा खड्डा नेमका खोदला कोणी? याबाबत माहिती स्पष्ट झालेली नाही. खड्डा खोदणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होणार कधी, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा :