छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असुन एकाचा वीज पडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिल्लोड, कन्नड, सोयगाव तालुक्याला पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा गावाला शुक्रवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. गावातील लोखंडी खांब अर्ध्यापासून पूर्ण वाकलेले आहेत. काही घरांचे आणि शेतातील शेडचे पत्रेही उडून गेले. कन्नड तालुक्यातही हीच परिस्थिती असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचीही नासाडी झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा येथील भिका राठोड या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला.
एक युवक आणि पाच जनावरे दगावली : सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्याच दरम्यान वीज पडल्याने अंबादास भिका राठोड या युवकाचा मृत्यू झाला. हा युवक शिरसाळा जवळील तांडा येथे बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून जात होता. अचानक आलेल्या पावसानंतर तो रस्त्यावरील लिंबाच्या झाडाखाली थांबला होता, त्याचवेळी विज पडली आणि तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अजिंठा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी पठवल्याची माहिती अजिंठा पोलिसांनी दिली. तर वसई शिवारात वीज पडल्याने कृष्णा सपकाळ या शेतकऱ्याच्या तीन गाई दगावल्या, शिरसाळा शिवरात मध्ये विज पडून श्रीराम नकोटे यांची एक गाय दगावली आहे. आणि अन्य एक अशा एकूण पाच गायी दगावल्याची माहिती समोर आली आहे.
402 हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण 1 लाख 22 हजार 180 शेतकऱ्यांचा नुकसान झाला असून त्यामध्ये 60 हजार 402 हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात 35 हजार 15 शेतकरी बाधित असून एकूण 13 हजार 535 हेक्टरवर नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायत 11 हजार 18, बागायत 12 हजार 233 हेक्टर, फळ पिकांचे 193 हेक्टरवर नुकसान झाले आहे.
जालना : जिल्ह्यात 4 हजार 215 बाधित शेतकरी असून जिरायत 5, बागायात 1 हजार 55, फळपीके 608 हेक्टर असे एकूण 1 हजार 69 हेक्टरवर नुकसान झाले आहे. परभणी : जिल्ह्यात 5 हजार 99 बाधित शेतकरी असून जिरायत 2 हजार 66.61, बागायात 697.90, फळपीके 296.30 हेक्टर असे एकूण 39 हजार 60.81 हेक्टरवर नुकसान झाले आहे.
हिंगोली : जिल्ह्यात 49 हजार 26 बाधित शेतकरी असून जिरायत 903, बागायात 24 हजार 14.53, फळपीके 521.99 हेक्टर असे एकूण 38 हजार 38.72 हेक्टरवर नुकसान झाले आहे. नांदेड : जिल्ह्यात 36 हजार 543 बाधित शेतकरी असून जिरायत 86 हजार 69.04, बागायात 107 हजार 19.91, फळपीके 21 हजार 90.55 हेक्टर असे एकूण 21 हजार 579.50 हेक्टरवर नुकसान झाले आहे.
बीड : जिल्ह्यात 4 हजार 215 बाधित शेतकरी असून जिरायत 5, बागायात 1 हजार 355, फळपीके 608 हेक्टर असे एकूण 1 हजार 969 हेक्टरवर नुकसान झाले आहे.
लातूर : जिल्ह्यात 22 हजार 535 बाधित शेतकरी असून जिरायत 9 हजार 692.29, बागायात 10 हजार 78.02, फळपीके 5 हजार 91.52 हेक्टर असे एकूण 10 हजार 367.86 हेक्टरवर नुकसान झाले आहे. धाराशिव (उस्मानाबाद) : जिल्ह्यात 2 हजार 652 बाधित शेतकरी असून जिरायत 1 हजार 142, बागायात 79.68, फळपीके 127.40 हेक्टर असे एकूण 1 हजार 349 हेक्टरवर नुकसान झाले आहे.