छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : नामांतराच्या मुद्द्यावरून शहरात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापत असताना, आता परिस्थिती सांभाळावी अन्यथा उद्योग व्यवसाय यांच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती उद्योजकांनी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवल आहे. इतकच नाही तर रोजगार टिकवायचा असेल तर, राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका मांडताना काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी केले आहे.
नामांतर केल्याने राजकीय वातावरण तापले : केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याचे परिपत्रक जारी केले त्यानंतर काही राजकीय आणि सामाजिक संघटनांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. त्यात नामांतर विरोधी कृती समिती, एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसांपासून साखळी आंदोलन केले जात आहे. गुरुवारी कॅण्डल मार्च करून आपला विरोध खासदार यांच्या जलील यांनी दर्शवला. शुक्रवारी शहर बंद ठेवण्याचा आवाहन करण्यात आले. त्याला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. तर दुसरीकडे शिंदे गट शिवसेना पक्षाने आता औरंगाबाद लिहिलेल्या पाट्यांवर छत्रपती संभाजी नगर करा, अन्यथा आम्ही ते करू अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे नामांतराच्या मुद्द्याहून राजकीय वातावरण तापले असताना सामाजिक वातावरण खराब होण्याची शक्यता गेल्या काही दिवसात वर्तवली जात आहे.
उद्योग जाण्याची भीती : शहरात सामाजिक स्वास्थ काही दिवसात खराब झाला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून केले जाणारे राजकीय वक्तव्य, त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन काही अप्रिय घटना शहरात होण्याची शक्यता नाकारली जात नाही. मात्र अशा घटना झाल्या तर उद्योग मागे पडू शकतात. इतकंच नाही तर काही नवीन उद्योग ज्या आगामी काळात येऊ शकतात. त्यांना ब्रेक लागू शकतो अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे, पत्र उद्योजकांनी लिहिल आहे. व्यवसाय उभा करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. मात्र, तो बंद पडण्यासाठी काही कारणच पुरेशी असतात. त्यामुळे सामाजिक स्वास्थ चांगले राहिले, तर उद्योग टिकेल, रोजगार कायम राहील अन्यथा मोठी हानी शहराला भोगावी लागेल अशी भीती उद्योजक मानसिंग पवार यांनी व्यक्त केले.
कोरोनामुळे आधीच नुकसान : कोरोनाच्या महामारीमुळे जगाला त्याचा परिणाम भोगावा लागला. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात मोठी उद्योग उभारणी गेल्या काही वर्षांमध्ये झाली. पण त्यात कोरोनाच्या दोन वर्षांमुळे ब्रेक लागला. जवळपास 25 ते 30 टक्के उद्योगांना परिणाम भोगाव लागला. मात्र या परिस्थितीवर उद्योजकांनी, कामगारांनी मात करत पुन्हा उभारी घेतली. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात उद्योजक आपला व्यवसाय घेऊन येण्यास तयार आहेत. मात्र, नामांतराच्या मुद्द्यावरून जर सामाजिक स्वास्थ खराब झाले, तर येणारे उद्योग पुन्हा इतरत्र जातील. ते शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून परवडणार नसेल. त्यामुळे आता राजकीय पक्षांनी शांततेच्या मार्गाने चर्चा करून वाद सोडवणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले.
पर्यटनावर होईल परिणाम : औरंगाबादला नव्याने नाव मिळालेले छत्रपती संभाजी नगर हे औद्योगिक दृष्ट्या विकसित होत असलेले शहर जरी असले, तरी याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले जागतिक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख आहे. अजिंठा, वेरूळ, बीबीचा मकबरा, दौलताबाद किल्ला यासारखी पर्यटन स्थळ पाहण्यासाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, जागतिक स्तरावर ज्यावेळी जिल्ह्याची चर्चा होते, त्यावेळेस जर येथील वाद, समस्या यांवर चर्चा झाली तर पर्यटक पाठ फिरवतात. नुकतेच g20 परिषदेच्या निमित्ताने पर्यटन स्थळांना एक जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात जर नामांतराच्या मुद्दाहून सामाजिक वातावरण खराब झाले तर, पर्यटक पाठ फिरवतील. त्याचा परिणाम छोट्या छोट्या व्यावसायिकांना देखील भोगाव लागेल. त्यामुळे आता राजकारणासाठी सामाजिक स्वास्थ खराब होता कामा नये असे मत पर्यटन व्यवसायिक जसवंत सिंग यांनी व्यक्त केले.
व्यावसायिकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : शहराच्या नामांतराच्या मुद्द्यानंतर खासदार यांच्या जलील यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करायला सुरुवात केली. त्यानंतर उद्योजकांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रावरून जलील यांनी संताप व्यक्त केला. उद्योजक, व्यवसायिक यांनी आधी नामांतराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. काही लोक खाजगीमध्ये विरोध दर्शवतात, मात्र प्रत्यक्षात समोर येऊन बोलत नाही. नामांतर कशासाठी याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यास परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. मात्र, गलिच्छ राजकारण, विकास या दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत. त्यामुळे उद्योजकांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर बरे, होईल असे मत खासदार यांच्या जलील यांनी व्यक्त केले.