औरंगाबाद- प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, नंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशी परंपरा ठाकरे कुटुंबाने टिकवली. मात्र, सावरकरांच्या वंशजांनी तशी परंपरा टिकवली नाही. 'सावरकर कुठं आणि त्यांचे वंशज कुठं,' असे म्हणत शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी सावरकरांच्या वंशजांवर टीकास्त्र सोडले.
लवकरच औरंगाबादचे नामांतर 'संभाजीनगर' असे होणार आहे. यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद नामांतराचा मुद्दा हाती घेत शिवसेनेवर टीका केली. मात्र, हा शिवसेना प्रमुखांनी घोषणा केलेला मुद्दा आहे आणि शिवसेनाच तो पूर्ण करणार आहे. लवकरच औरंगाबादच्या नागरिकांना याची गोड बातमी मुख्यमंत्री देतील, असे खैरे म्हणाले.
भाजप सरकार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. मात्र, तो काही कामाचा नाही. दिल्ली निवडणुकीत भाजपने पैसे वाटले. मात्र, दिल्लीकरांनी त्यांना निवडून दिले नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला चिमटा काढला.
राज ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा सुरू केला आहे. मात्र, येथे प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी दौरा आटोपता घेतला आहे. औरंगाबाद महानगर पालिकेच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे शहरात आले असले तरी आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते येणार नाहीत, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला.