औरंगाबाद - खड्डेयुक्त रस्त्यांवर आंदोलन करणे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना महागात पडले आहे. सोमवारी जलील यांच्यासह एमआयएम कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यांवर आंदोलन केले होते. याप्रकरणी जलील यांच्यासह 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीन महिन्यापासून औरंगाबाद शहरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ही दुरावस्था महानगरपालिकेसमोर मांडण्यासाठी एमआयएमने आंदोलनाचा मार्ग निवडला. मात्र, आंदोलन करताना कोरोना विषाणू संसर्गामुळे गर्दी होऊ नये, या नियमाकडे जलील यांनी दुर्लक्ष केले. प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही गर्दी केल्यामुळे त्यांच्यावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे स्टेशनच्या गेट समोर एमआयएम कार्यकर्त्यांनी खड्डेयुक्त रस्त्यांच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनात पालिका आयुक्त आणि पालिकेच्या एकूण कारभारा विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडवण्यात आला. अनेक कार्यकर्ते विना मास्क आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार जलील स्वतः करत होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानादेखील आंदोलन केल्याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यामध्ये जलील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इम्तियाज जलील यांच्यासोबतच माजी शहराध्यक्ष समीर साजिद, अरुण बोर्डे, मुन्शी पटेल, नासिर सिद्धिकी, आरेफ हुसेनी, गंगाधर ढगे यांच्यासह 70 कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एमआयएम कार्यकर्त्यांवर एकाच महिन्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. 1 सप्टेंबर रोजी धार्मिक स्थळे उघडण्यासाठी खडकेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमआयएम कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता रेल्वे स्टेशन परिसरात खराब रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्ष आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.