सिल्लोड (औरंगाबाद) - सोयगाव मतदारसंघातील पोलीस ठाण्यांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्या पडून पोलिसांचा जीविताला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या जीर्ण झालेल्या इमारती पडण्यापूर्वी बांधाव्यात, अशी मागणी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना केली. गुरुवारी त्यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रताप जाधव तसेच गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनेक इमारती निजामकालीन -
सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील अनेक पोलीस ठाण्यांच्या इमारतीत निजामकालीन आहेत. त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहेत. इमारत कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांच्या जीवितास धोका आहे. तसेच सोयगाव आणि फर्दापूर येथे तर पोलीस ठाण्यासाठी भाड्याने घेण्यासाठी ही इमारती नसल्याची बाब राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. अजिंठा हे जागतिक पर्यटनक्षेत्र आहे. जगभरातून लाखो पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र, त्यांना काही अडचणी आल्यास या ठिकाणी पोलीस ठाण्याची चांगली इमारत नसल्याची खंत राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - 'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार' - जयंत पाटील
तर तलाठी कार्यालयात देणार ओपीला जागा -
सिल्लोड तालुक्यात तलाठ्यांचे कार्यालय बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. अशा सात कार्यालयांमध्ये पोलीस दूरक्षेत्र कक्षास (पोलीस आउट पोस्ट) जागा देण्याचे आश्वासन, यावेळी मंत्री सत्तार यांनी दिले.