औरंगाबाद -रस्त्याच्या मधोमध दुचाकीसमोर आलेल्या कुत्र्याला वाचवताना दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास जालना मार्गावरील आकाशवाणी चौकात ही घटना घडली. योगेश मधुकर राऊत ( वय २४, रा. एन २, ठाकरेनगर, मूळ रा. सोयगाव देवी, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृताचे नाव आहे.
कुत्र्याला वाचवणे पडले महागात
वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत योगेश नोकरी करतो. गुरुवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास दुचाकीने तो कामावरून घरी जात होता. शहरातील आकाशवाणी चौकाजवळील सुवर्णपेढीसमोर अचानक एक मोकाट श्वान त्याच्यासमोर आला. श्वान समोर आल्यामुळे काहीशा वेगात असणाऱ्या योगेशने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. वाहनाचा वेग कमीही केला. मात्र तेवढ्यात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि उजव्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकला. जोरात धडकून तो खाली पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगेशला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी रात्री २.१० वाजता योगेशला तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून हवालदार राठोड पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा - प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हेच खरे सूत्रधार, NIA ला आधीपासून होता संशय