कन्नड (औरंगाबाद) - तालुक्यातील करजखेडा येथील ११५ गॅस टाक्या व ९१५० किलो तांदळाचा विना परवानगी माल आढळून आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून गॅस व रेशनचा तांदुळ असा एकूण ५ लाख ६१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपींची नावे -
करंजखेडा गावातील आरोपी सुभाष तेजराव गवारे, कलीम खा. आयुब खा. पठाण, बिस्मिल्ला गुलाम शेख, कडूबा माणिकराव वाघ अशी आरोपींची नावे आहेत. ते आपल्या दुकानात विनापरवाना बेकायदेशीररित्या घरघुती वापराचा गॅस सिलेंडर ताब्यात बाळगून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांना चढ्या भावाने विक्री करतात, अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भगवान फुंदे यांच्या आदेशाने करंजखेडा येथील बस स्थानकाजवळ सुभाष तेजराव गवारे (३२) यांच्या जनरल स्टोअर्सवर छापा मारण्यात आला.
इतका माल आढळला -
सुभाष तेजवारे याच्या दुकानात स्टअर्सच्या पाठीमागील पत्र्याच्या रूममध्ये इंडियन कंपनीचे गॅस भरलेली चार सिलेंडर, रिकाम्या सतरा सिलेंडर, तर भारत गॅस कंपनीचे भरलेली व रिकामी प्रत्येकी एक सिलेंडर आढळून आले. तर कलीम खा पठाण यांच्या दुकानात इंडियन गॅसचे भरलेले बावीस सिलेंडर, रिकामे सात सिलेंडर, भारत गॅसचे भरलेले चार सिलेंडर, रिकामे दोन सिलेंडर, एचपी गॅसचे भरलेले वीस सिलेंडर, रिकामे चौदा सिलेंडर तर इंडियन व्यावसायिक भरलेले तीन सिलेंडर आणि रिकामे एक असा एकूण १ लाख ९२ हजार ६०० रुपये किमतीचा विनापरवाना माल आढळून आला.
हेही वाचा - कोरोना अपडेट : पोलीस खात्यात 50 टक्के उपस्थिती, वर्क फ्रॉम होम सुरू
तर कडूबा माणिकराव वाघ (५५) यांच्याकडे भारत गॅसचे भरलेले सहा सिलेंडर, रिकामे तीन सिलेंडर असा २३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. बिस्मिल्ला गुलाम शेख यांच्याकडे एचपी कंपनीचे भरलेले दोन सिलेंडर, रिकामे एक सिलेंडर, भारत गॅसचे रिकामे एक इंडियन कंपनीचे गॅस भरलेले पाच सिलेंडर, रिकामे एक सिलेंडर, असा २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. तर यातील एक आरोपी कालीम खा. अय्युब खा. यांच्या करंजखेडा- चिंचोली रस्त्यावरील गोदामात रेशनचा तांदूळ व गहू ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.
याठिकाणी छापा टाकला असता स्वस्त धान्य वितरित होणाऱ्या तांदळाच्या लहान मोठ्या वेगवेगळ्या वजनाच्या १३९ गोण्या (९१.५०किलो) वजनाचे रेशनचा तांदूळ त्यांची किंमत २ लाख ७४ हजार ५००/- बेकायदेशीररित्या व चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाळगला, असा एकूण 115 गॅस सिलेंडर आढळून आले. नमूद आरोपींना पिशोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या चारही आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम व स्फोटक पदार्थ अधिनियम कायद्याअंतर्गत पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कन्नड शहराचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे हे करीत आहे.