औरंगाबाद - संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजपने औरंगाबादेत आक्रमक आंदोलन करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करत असताना भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. आक्रमकपणे घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी असणाऱ्या संजय राठोड वर अद्याप कारवाई का नाही झाली, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला. अशा अत्याचारी मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा होता, मात्र हे सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्या मंत्र्याची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी भाजपच्या आंदोलकांनी केली.
सरकार अत्याचारी असल्याचा भाजपचा आरोप
याआधी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील एका महिलेने अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी देखील सरकारने हे आरोप दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता संजय राठोड हे देखील अशाच एका घटनेत दोषी असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे मंत्रीच असे अत्याचारी असतील तर, महिला आणि मुलींना सुरक्षा कशी वाटेल, असा प्रश्न भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी उपस्थित केला. राज्यातील सरकार अत्याचारी आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीच अधिकार राहिलेला नाही. अशा दोषी मंत्र्यांवर कारवाई जर करण्यात येत नसेल तर महाविकास आघाडीने सरकार सोडावे, अशी मागणी भाजप आंदोलकांकडून करण्यात आली.