वैजापूर(औरंगाबाद) - बोरदहे गावातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरू करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर योजना सुरू करण्यासाठी पाच कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजुर केला. मात्र सत्तेत असतांना योजनेबद्दल 'भ्र' शब्दही न काढणारे या योजनेतील गैरव्यवहाराबद्दल बोलत आहेत. त्यांना भ्रष्टाचार आत्ताच आठवला का? असा सवाल करत माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांवर तोफ डागली. त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन बागडे यांनी मतदारांना केले.
बागडे म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून मी सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. कुठलीही योजना किंवा संस्था बंद पडल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
बोरदहेगाव येथे दिवंगत माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निवासस्थानी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांसाठी आयोजित संवाद सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे (पैठण), महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, विद्यमान चेअरमन नितीन पाटील, माजी आमदार आण्णासाहेब माने, संचालक अभिजित देशमुख, माजी उद्योग संचालक जे.के. जाधव, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, रामकृष्ण बाबा यांचे चिरंजीव आप्पासाहेब पाटील, काकासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे,नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलकडून आप्पासाहेब पाटील, आणि विशेष मागास प्रवर्गासाठी असलेल्या राखीव मतदारसंघातून वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी हे निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्हा बँकेला अव्वल स्थानी आणू-
जिल्हा मध्यवर्ती बँक ही मराठवाड्यातील अग्रगण्य बँक असून ती महाराष्ट्रात क्रमांक एकवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे भुमरे यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेला चालु वर्षात साडे आठ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे, साडे आठशे कोटी रुपयांच्या कर्जमाफीमुळे बँकेची परिस्थिती सक्षम आहे. बँकेने साडे पाचशे कोटी रुपये कर्जरुपाने वाटप केले आहेत. पण कर्जमाफी हा अंतीम पर्याय नाही, असे मत नितीन पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. परदेशींना मताधिक्य मिळणार!
या कार्यक्रमाला सहकारी संस्था मतदार संस्था मतदार संघातील ११५ पैकी ९२ मतदार हजर होते. त्यामुळे या पॅनलचे उमेदवारी उमेदवार विजयी होतील. डॉ. दिनेश परदेशी हे सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.