औरंगाबाद - दारूच्या पैशावरून दोन गटात झालेल्या वादाने शेवटी तलवारबाजींचे रूप घेतले. ही घटना रविवारी पावणेबारा वाजेच्या सुमारास शहरातील जयभवानीनगर येथे घडली. या टोळी युद्धात दोन्ही गटातील सात जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास जयभवानी नगरमधील एका वाईनशॉपमध्ये सिद्धर्थ निकाळजे हे गेले असता त्यावेळी हॉटेलचालक सतीश मारुती हजारे यांच्यासमवेत दारूच्या पैसे देण्यावरून दोघात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला असून तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडे घेऊन दोन्ही गट एकमेकात भिडले. या हाणामारीत सात जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी अभिजित आणि बुधभूषण या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दोन्ही गटातील 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सतीश मारुती हजारे, धनराज सखाराम जाधव, अनिल रावसाहेब जाधव, शेखर हजारे यांना पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.