औरंगाबाद - श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांना दाढी कटिंग मोफत करून देण्याचा उपक्रम औरंगाबादच्या एका सलून चालकाने राबवला. औरंगाबादेत पानी फाऊंडेनच्या माध्यमातून खुलताबाद तालुक्यात श्रमदान करण्यात आले. या उपक्रमात श्रमदात्याचा उत्साह वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा - २०१९ च्या माध्यमातून खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव येथे सकाळी साडेसहा वाजता श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. पाणी बचतीचे काम करणाऱ्या लोकांचा उत्साह वाढवा यासाठी सलून चालक सुमित पंडित यांनी थेट शेताच्या बांध्यावर मोफत दाढी कटिंग करून देण्याचा उपक्रम राबवला. ही योजना पाहून उपस्थित श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांना वेगळाच उत्साह आला. श्रमदान करणाऱ्या 37 गावकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला.
प्रत्येकाने सामाजिक कार्यात आपापल्या परीने हातभार लावला तर समाजातील कुठलेही काम करणे अवघड जाणार नाही. संत गाडगे महाराजांचे विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही माणुसकीला जपत समाजसेवा करीत आहोत. यामधून मिळणारा आनंद मोठा असल्याचे मत सलून चालक सुमित पंडित यांनी व्यक्त केले.