औरंगाबाद - औरंगाबाद येथील बजाज कामगार युनियनने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची साथ सोडली आहे. प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या कामगार युनियने आता मात्र, हर्षवर्धन जाधव यांना समर्थन दिले आहे. शहराच्या विकासासाठी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देत असल्याचे युनियन तर्फे सांगण्यात आले. मोदींचे हात बळकट करायचे आहेत, त्यासाठी हर्षवर्धन जाधव हा उत्तम पर्याय असल्याने त्यांना समर्थन देत असल्याचे देखील बजाज कामगार युनियनतर्फे सांगण्यात आले.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची हक्काची असलेली बजाज कामगार युनियन आता त्यांच्यासोबत नाही. बजाज कामगार युनियनच्या कामगारांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार आणि शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठिंबा दिला आहे. गेल्या काही वर्षांत शहराचा विकास थांबला आहे. नवीन रोजगार निर्माण झाले नाही, शहरात एकही नवीन मोठा प्रकल्प आला नाही, त्यामुळे शहराची गती थांबली असून त्या गतीला चालना देण्याची गरज असल्याचे मत कामगारांनी व्यक्त केले. शहराचा विकास पुन्हा व्हावा यासाठी बदल हा आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले धोरणं वापरत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी हर्षवर्धन जाधव हा चांगला पर्याय असल्याने यावेळेस बजाज कामगार युनियन ही हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे कामगार युनियनने जाहीर केले.
दोन दिवस आधी शिवसेनेसोबत असणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवारानेदेखील हर्षवर्धन जाधव यांना आपल्या समर्थन दिल. आगामी काळात अनेक संघटना पाठिंबा देणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी सांगितले. ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेची हक्काची मते आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी उभे राहत असल्याने शिवसेनेच्या अडचणीत आगामी काळात वाढणार असल्याचे दिसून येत आहे. आता शिवसेना गेलेली मत परत आणण्यासाठी काय रणनीती आखणार हे पाहण्यासारखा असेल.