औरंगाबाद - प्रचाराला सुरुवात व्हायच्या आधीच औरंगाबादेत काँग्रेसच्या उमेदवाराला लहानशी चूक चांगलीच भोवली आहे. निवडणूक अर्ज भरत असताना गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी असलेल्या कॉलममध्ये माहिती न भरल्याने औरंगाबाद पश्चिमचे काँग्रेस उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.
हेही वाचा - बसपाच्या संपर्क प्रमुखाला इच्छुकांची मारहाण; तिकीट वाटपात पैसे घेतल्याने वाद
काँग्रेसतर्फे औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघासाठी 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक' या गटाचे रमेश गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरत असताना गायकवाड यांनी दोन अर्ज सादर केले होते. मात्र, दोन्ही अर्ज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बाद ठरवले असल्याने आता पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता चांगलाच अडचणीत आला आहे.
हेही वाचा - सत्तार यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रभाकर पालोदकर अपक्ष लढणार
रमेश गायकवाड यांनी 4 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरला होता. एका अर्जात त्रुटी निघाल्यास दुसरा अर्ज असावा, यासाठी अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरला होता. मात्र, दोनही अर्ज सादर करत असताना गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी असणारा रकाना रिकामा राहिल्याने त्यांनी सादर केलेले अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे रमेश गायकवाड आणि काँग्रेस पक्षाला औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवता येणार नाही. निडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे रमेश गायकवाड यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
औरंगाबाद शहर निवडणुकीपूर्वीच काँग्रेस मुक्त
शहरातील तीन विधानसभा मतदार संघापैकी एकाही मतदार संघात काँग्रेसची पंजा निशाणी दिसणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीआधी औरंगाबाद शहर काँग्रेस मुक्त झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उमेदवारी अर्ज छाननीमध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते आता कोणाचा प्रचार करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
आघाडीच्या जागावाटपात औरंगाबाद मध्य राष्ट्रवादी काँग्रेस, औरंगाबाद पूर्व समाजवादी पक्ष आणि अनुसूचित जातीसाठी राखीव औरंगाबाद पश्चिम काँग्रेसच्या वाट्याला आला. पश्चिममधून काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी इच्छुक होते. मात्र, पक्षाने या मतदारसंघात आयात उमेदवार रमेश गायकवाड यांना उमेदवारी दिली. गायकवाड हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत. जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे त्यांना ही उमेदवारी मिळाली होती. येथून काँग्रेस एससी सेलचे डॉ. जितेंद्र देहाडे इच्छुक आणि प्रबळ दावेदार मानले जात होते. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे देहाडे यांनी सांगितले आहे.