औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा सीबीएससीच्या परीक्षादेखील पुढे ढकलल्या आहेत. त्यापाठोपाठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात नियोजित होत्या. त्यासंदर्भातील वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले होते. शिवाय विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आले होते. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे या परीक्षा 2 मेनंतर घेण्यात येईल, तसेच त्याचे वेळापत्रक सविस्तर कळवण्यात येईल, असे विद्यापीठाने परिपत्रक काढून कळवले आहे. त्यानुसार विद्यापीठ, उस्मानाबाद केंद्र आणि संलग्न सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.