औरंगाबाद - अभिनेत्री कंगना रणौतच्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 'अभिनेत्री कंगना रणौतचा बोलवता धनी लवकरच समोर येईल. तिने तिचा अभिनय करावा. इतर गोष्टींमध्ये तिने पडू नये. तसेच माफी मागावी. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील निर्णय घेतील', असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच कंगनाने माफी नाही मागितली तर तिला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही राज्यमंत्री सत्तार यांनी दिला. अभिनेत्री कंगना रणौतने राजकारण्यांच्या सांगण्यावरुन बोलू नये. कंगनाने पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरावे, असा टोलाही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला.
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरसोबत केल्याने तिच्यावर सर्वच बाजूने टीका सुरू झाली. ती सध्या तिने केलेल्या वक्तव्यांमुळे वादात सापडली आहे. संजय राऊत यांनी तिला इशारा दिला असताना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही तिच्यावर टीका करत तिला इशारा दिला. कंगना या अभिनेत्री आहेत. त्यांनी उगाच राजकारण करू नये आणि तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. तसेच राजकारण करायचे असेल तर त्यांनी राजकारणात यावे आणि निवडणूक लढवावी. उगाच असली विधाने करुन राज्याची बदनामी करू नये, असे सत्तार म्हणाले.
हेही वाचा - कंगनाचा सूर नरमला, म्हणे 'मुंबई हीच माझी कर्मभूमी तिच माझी यशोदा मैय्या'
तसेच अभिनेत्री कंगना यांनी माफी मागितली नाही तर त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला तर आम्हाला कुणी म्हणू नये. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, याचे नाव पुढे येईलच. मात्र, सध्या तरी त्यांनी माफी मागावी इतकेच आमचे म्हणणे असल्याचे सत्तार म्हणाले. तर अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे त्यांच्या ट्वीटच्या आशयाने सत्तार म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
एखाद्याच्या वक्तव्याशी आपण सहमत असू शकत नाही. मात्र, लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याच्या अधिकाराचे आपण रक्षण केले पाहिजे. भाषण स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य, माध्यमांचे-स्वातंत्र्य दडपू शकत नाही. आमच्याकडे प्रतिदावे असू शकतात. मात्र, आपल्या विरोधकांचे पोस्टर्स चपलांनी तुडवणे ही खालच्या दर्जाची बाब आहे.