औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे विशेष नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी शिवसेना आमदारांनी राज्य सरकारला केली आहे. याबाबत पाठपुरावा करत असल्याचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले.
बुधवारी औरंगाबाद शहरातील दोन खासदार आणि पाच आमदारांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शिवसेना आमदारांनी ही भूमिका घेतली. विशेष टास्क फोर्स निर्माण करून कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी देखील मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रोज २०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा राबवत असलेल्या उपाय योजना कुचकामी ठरत असल्याचा आरोप शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केला. शहरातील स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आता राज्य सरकारनेच कडक पावले उचलायला हवीत. त्यासाठी शहरात नोडल अधिकाऱ्यांची नेमून करून त्यांच्यामार्फत उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
गेल्या तीन महिन्यांत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपाय योजना राबवल्या. त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी कुठल्याच पद्धतीने हस्तक्षेप केला नाही. मात्र, आता परिस्थिती गंभीर झाली असून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयेही रुग्णांची लूट करत आहे. त्यांच्यावरही नियंत्रण ठेवण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले.