छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने एक परिपत्रक जारी करून त्यांनी औरंदाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले आहे. त्यामुळे राज्यात सर्व ठिकाणी जल्लोष पहायला मिळत आहे. औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय हा शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा होता, कारण 1988मध्ये हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनीसर्वप्रथम औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. चला जाणून घेवूयात संभाजीनगरच्या नामांतराचा संपूर्ण इतिहास..
बाळासाहेबांची 35 वर्षांपूर्वीची घोषणा : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम १९८८ रोजी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत औरंदाबादच्या नामांतरणाची घोषणा केली होती. 1988 साली शिवसेनेने औरंगाबाद महापालिका निवडणुकीत इंट्री केली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे तब्बल एक-दोन नव्हे तर २७ नगरसेवक निवडून आले होते. पण ३ नगरसेवकांअभावी शिवसेनेची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. मात्र, शिवसेनेने पहिल्याच निवडणुकीत तिथल्या लोकांच्या मनात स्थान प्राप्त केले होते. शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळवले होते. ८ मे १९८८ रोजी झालेल्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणार अशी घोषणा केली होती.
औरंगाबाद नव्हे संभाजीनगर म्हणा : सभेत बाळासाहेबांनी जोरदार भाषण केले. इतकेच नाही तर आजपासूनच संभाजीनगर म्हणा, अशी सूचना शिवसैनिकांना केली होती. तेव्हापासून शिवसेनेकडून संभाजीनगर असाच उल्लेख केला जातो. पुढे काही महिन्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडूनदेखील औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख सुरु झाली. शिवसेनेची ताकद म्हणून कायम शिवसेना नेत्यांकडून संभाजीनगरच्या नावाचा आग्रह राहिला. त्यानंतरच औरंगाबादचे सर्व राजकारण 'संभाजीनगर' नावाभोवती फिरू लागले. सर्व पक्ष मतांसाठी संभाजीनगर नाव बदलणार अशा घोषणा करू लागले.
नावावरून राजकारण : 1988 नंतर झालेल्या सर्व लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूका संभाजीनगर नावाभोवती शहरातल्या इतर मुद्द्यासोबत फिरू लागल्या. त्य़ामुळे शिवसेनेला औरंगाबाद शहरातून मोठे यश मिळत गेले. राज्यात शिवसेनेची सत्ता आली की संभाजीनगर नामकरण करू असे शिवसेनेकडून आश्वासन दिले गेले होते.मात्र या गोष्टीला भरपूर वेळ लागला. शवसेनेला त्यावेळी भाजपचा देखील पाठिंबा मिळाला.
१९९५ मध्ये युतीची सत्ता : राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता १९९५ मध्ये आली. त्यावेळी १९ जून १९९५ मध्ये पहिल्यांदा औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करण्याचा ठराव औरंगाबाद महापालिकेने मंजूर केला होता. महानगरपालिकेने मंजूर केलेला तो ठराव राज्य सरकारकडे देखील पाठवला होता. सुदैवाने त्यावेळी राज्यात युतीचे सरकार होते. त्यामुळे अवघ्या पाचच महिन्यात औरंगाबादचे नाव संभीजीनगर करण्यात आल्याची अधिसूचना काढण्यात आली. त्यानंतर लगेच तत्कालीन मंत्रिमंडळाने संभाजीनगर नावाला मंजूरी दिली. पण घोडे अडले ते राज्य सरकारच्या या निर्णायाला तिथल्या एका नगरसेवकाने न्यायालयात आव्हान दिले. मुश्ताक अहमद या नगरसेवकाने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले. पुढे हा विषय निकाली निघाला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार : मात्र, राज्यात पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले. त्यानंतर त्यांनी २००१ या मध्ये संभाजीनगरचा प्रस्ताव मागे घेतला आणि त्यामुळे याचिका सुद्धा रद्द झाली. त्यानंतर पुन्हा २०१४ मध्ये राज्यात युतीची सत्ता आली. आता जिल्ह्याचे नाव संभाजीनगर होईल, अशी आशा शिवप्रेमींच्या आणि राज्यातील सर्वच नागरिकांच्या मनात निर्माण झाली, पण त्याकाळात फारशे प्रयत्न झाले नाहीत. महाविकास आघाडीच्या काळात सर्व अहवाल मागवले गेले, त्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले होते.
२०११ मध्ये शहराची जनगणना : मार्च २०२० मध्ये औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. तथापि, केंद्राकडून यास अद्याप परवानगी मिळाली नाही. २०११ मध्ये शहराची जनगणना झाली. त्यावेळी ३०.८ टक्के मुस्लिम आणि जवळपास ५१ टक्के हिंदू नागरिक औरंगाबादमध्ये असल्याची आकडेवारी समोर आली होती. त्यामुळे साहजिकच संभाजीनगर नावाला पसंती मिळेल असा दावा इतिहास कारांकडून केला गेला होता.