औरंगाबाद - सिल्लोड शहरात 30 नोव्हेंबरला एका मोबाईलच्या दुकानातून 1 लाख 5 हजार रुपये रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली होती. ही चोरी करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे. या टोळीत दोन महिलांसह चार जणांचा समावेश आहे. सर्व आरोपी कर्नाटक येथील रहिवासी आहेत.
राजू फसलेटी, अलवेली फसलेटी या महिला तसेच कल्याण बोगी आणि गणेश बेस्तर, अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीने बुलडाणा, सिंदखेडराजा, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, सांगली जिल्ह्यांमध्येही अनेक गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. ही टोळी व्यापारी, पिगमी एजंट, बँकेतून रोकड काढणारे आणि मौल्यवान वस्तू घेऊन जाणाऱ्यांना लक्ष्य करायची. त्यांनतर त्यांचा पाठलाग करून ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी त्यांच्याकडील बॅग पळवायची.
हेही वाचा - धक्कादायक..! अज्ञात व्यक्तीची शाळकरी मुलींना मारहाण; अजिंठ्याच्या शाळेतील प्रकार
विशेष म्हणजे व्यापारी, व्यावसायिकांनी दुकान बंद केल्यानंतर ही टोळी त्या कुलूपामध्ये फेविकॉल टाकत असे. दुसऱ्या दिवशी कुलूप उघडत नसल्याने व्यापारी बॅग खाली ठेवत असे. त्याचवेळी संधी साधून ही टोळी बॅग लंपास करत असे.