औरंगाबाद - रात्री पडलेल्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यातील बनकीन्होळा गावाजवळ औरंगाबाद -जळगाव रस्त्यावरील नव्याने करण्यात आलेला पूल वाहून गेल्याने, या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून निल्लोड-कायगाव रस्त्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. सिल्लोडच्या आठ मंडळांपैकी 5 मंडळात रात्री जवळपास 100 मि. मी. पाऊस पडला.
हेही वाचा - मतदानाला आलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार
गेल्या 3 वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. कामाला विलंब झाल्याने व खोदकाम करून ठेवल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सतत वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. मोठे वाहने गाळात फसत असून दुचाकीधारकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा - 'खरीप पिकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे फॉर्म भरावेत'
या पुलाचे काम निकृष्ट झाले असून या पुलात टाकलेल्या नळकांड्या एकमेकास जोडलेल्या नव्हत्या. या कामात मातीचा वापर केला गेला असून हा पूल ढासळून यामुळे शेतात पाणी शिरुन शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पंचनामा करून नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी केली. दरम्यान महसूल विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून शेतातील पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहेत. पुलाच्या कामासाठी पोकलेन आले असून सध्या निल्लोड -कायगाव मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.