छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र तेलंगाणा सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. राज्यातून पाठवलेल्या कांद्याला तेलंगाणात पंधराशे ते अठराशे रुपये दर देण्यात आला. महाराष्ट्राच्या मानाने चार पट अधिकचा दर देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तर त्याला लागणारे मजूर वाहन गोण्या यांची देखील सोय करण्यात आली होती. आगामी काळात शेतकऱ्यांनी आपला कांदा तेलंगाणाकडेच पाठवावा, असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले.
तेलंगणा सरकारने दिला चौपट दर : राज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. रस्त्यावर उतरून आंदोलन केली, कष्टाचा कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. मात्र सरकार दरबारी त्याची दखल घेतली गेली नाही. त्यावेळी हैदराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे कांदा पाठवा असे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कन्नड येथील शेतकऱ्यांनी कांदा तेलंगाणाकडे पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी लागणारे गोण्या मजूर आणि वाहन पाठवण्यात आले. पहिल्या टप्प्यात चार ट्रक कांदा कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठवला. यावेळी काय भाव मिळेल, फायदा होईल का अशा अनेक शंका शेतकऱ्यांना वाटत होत्या. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दाखल होताच कांद्याचा दर्जा पाहून त्यांना दर देण्यात आला. कमीत कमी दीड हजार ते जास्तीत जास्त 1800 रुपये असा दर कांद्याला मिळाला. राज्यात मिळणाऱ्या दरापेक्षा चार पट अधिक दर मिळाल्याची माहिती बीआरएसचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली.
यापुढेही तेलंगाणात कांदा पाठवा : राज्यात गेल्या दोन महिन्यात कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांना रडवले. कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव देण्यात आला. केलेला खर्च देखील निघाला नाही, गाडीचे भाडे देखील खिशातून भरावे लागले. त्यामुळे आता या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न पडला होता. कन्नड तालुक्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलन करत, शेती मालाला चांगले दर द्या असे आवाहन तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचेकडे केले. बीआरएस पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण केले असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात आपला कांदा असो की इतर पीक राज्यात जर दर मिळत नसतील, तर तेलंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठवा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.
हेही वाचा -