औरंगाबाद - जिल्ह्यतील शेतकऱ्यांच्या परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली नाही. यावर आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसत आंदोलनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करत, जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे खराब झालेला भाजीपाला फेकला. तसेच समोर मुख्यमंत्र्यांच्या फोटोसोबत खराब झालेल्या भाज्यांची आरती केली.
जिल्ह्यासह मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन सारख्या पिकांचे नुकसान झाले. सरकार अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी आक्रमक होत नुकसान झालेली पीक हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत, जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काढले. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकसान झालेल्या पिकांची पूजा करत मुख्यमंत्र्यांच्या फोटोची आरती केली.
शेतकऱ्यांच्या मागण्या -
- नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच्या शेतात पंचनामे न करता 75 हजार हेक्टरी मदत द्या.
- औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा.
- फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लक्ष रु तातडीची मदत द्यावी.
- या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिके उभे करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रु तात्काळ मदत करावी.
- या वर्षीचे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे सरसकट सर्व वीज बील माफ करावे.
- या वर्षीच्या खरीप हंगामासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत बँकांनी दिलेले संपूर्ण पीक कर्ज माफ करावे.
- चालू वर्षीचे खरीप हंगामासाठी फळबागांसह सर्व शेतपिकांचा पीकविमा तात्काळ मंजूर करावा.