औरंगाबाद : चैनीच्या वस्तू वापरण्यासाठी घेतलेले कर्ज फेडता यावे याकरता युवकांनी चक्क भरदिवसा सोन्याचे दुकान लुटले आहे. पाच दिवसांपूर्वी वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगावात एका ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा पडला होता. या दरोड्यातील आरोपींना गुन्हे शाखेने चाळीसगाव येथून पाठलाग करत मुंबईहून अटक केली. त्यांच्याकडून 13 लाख 35 हजार 407 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. योगेश तायडे, निलेश सोनवणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मात्र पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. इतक्या मोठ्या दरोड्यात इतके कमी दागिने कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भर दिवसा लुटले : 8 ऑगस्ट रोजी रांजणगाव शेणपुंजी येथील मंगलमूर्ती ज्वेलर्समध्ये सकाळी दहा ते अकराच्या सुमारास 25 ते 30 वयोगतील चोर आले. त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण सुरू केली. त्याला मारत दुकानाच्या एका कोपऱ्यात नेले, त्याचे हात बांधले, तोंडाला बोळा लावला. इतर दोघांनी दुकानाचे शटर बंद केले. दुकानातील दागिने बॅगमघ्ये भरायला सुरुवात केली. अवघ्या पाच मिनिटात दुकानातील सर्व दागिने बॅगमध्ये भरले आणि दुकानातून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. देण्यात आलेल्या तक्रारीनुसार 13,35,000 किंमतीचे ज्यात सोन्याचे दागिने अंदाजे 200 ग्रॅम वजनाचे व दोन किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेले होते.
पाठलाग करून पकडले चोर : आठ ऑगस्ट रोजी चोरी करून योगेश तायडे, आरमान तडवी आणि निलेश सोनवणे पसार झाले. मिळालेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार घेत पोलिसांना तपास सुरू केला. योगेश तायडे हा आरोपी चाळीसगावमध्ये असल्याची माहिती मिळाली, तोपर्यंत तो काशी एक्सप्रेसमधून पसार झाला होता. पोलिसांनी लोहमार्ग आणि रेल्वे पोलिसांना माहिती देत जीपने रेल्वेचा पाठलाग केला. लोहमार्ग पोलिसांनी आरोपी शोधण्यात असफल राहिले. अखेर तो कल्याण येथे पोहोचला. मात्र पोलिसांनी हार न मानता कल्याणमध्ये जाऊन तपास सुरू केला आणि योगेश तायडे याला शोधून काढत अटक केली. तर उर्वरित दोघांचाही तपास लागला, दरोडा टाकलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. टीव्हीवर चोरी दरोड्याचे सिनेमे पाहून हा पूर्ण प्लॅन रचला असल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितली.
मुद्देमाल कमी कसा : मंगलमूर्ती ज्वेलर्स येथे पडलेल्या दरोड्याबाबत फिर्यादी मुकुंद केंद्रे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार 13 लाख 35 हजारांचे दागिने चोरी गेल्याची तक्रार दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यात आता एवढा मोठा दरोडा पडला असताना मुद्देमाल इतका कमी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुकान मालकाला गुन्हे शाखेने दोन लाख रुपये मागितल्याचा देखील आरोप केला जात आहे. इतकेच नाही तर मुद्देमाल जास्त गेला असताना तो कमी दाखवण्यात आला अशी देखील तक्रार समोर आली आहे. याबाबत आमच्याकडे कुठलीही तक्रार उपलब्ध नसून, याबाबत योग्य माहिती घेऊन कारवाई करू असे आश्वासन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिले.
हेही वाचा -