औरंगाबाद - बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडावी. मात्र, त्याचा निकाल राखीव ठेवावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. 4 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांच्या अपात्रतेबाबत सुरू असलेल्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत अध्यक्षपदाचा निकाल जाहीर न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
बीड जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी व्हीप झुगारला होता. यानंतर त्यांनी भाजपला मदत केली होती. यामुळे त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगितीची कारवाई केली होती. ती कारवाई राज्य सरकारने कायम ठेवली. त्या सदस्यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. त्यावर खंडपीठाने अपात्रतेला स्थगिती दिली. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान करण्याविषयी न्यायालयाकडे विचारणा करण्यात आली. त्याबाबत न्यायालयाने अपात्र सदस्यांना मतदानाचा हक्क असणार नाही, असे सांगितले.
हेही वाचा - 'खातेवाटपाचा निर्णय आठ दिवसापुर्वीच झालाय, आज किंवा उद्या मंत्र्यांना खातेवाटप होईल'
जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया ठरल्याप्रमाणे राबवावी. मात्र, खंडपीठाने या प्रकरणात सुनावणी होऊन निकाल जाहीर होईपर्यंत जि. प. अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करू नये, असे निर्देश दिले आहेत.