औरंगाबाद- कचरा वेचण्यासाठी निघालेल्या वृध्द महिलेला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री एकच्या सुमारास घडली. कडूबाई बाबुराव खंडांगळे (वय, ७० रा. इंद्रानगर) असे या मृत महिलेचे नाव आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कडूबाई या कचरा वेचण्याचे काम करतात. रात्री एक वाजेच्या सुमारास आकाशवाणी समोर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज आल्याने आकाशवाणी येथील सुरक्षारक्षकाने धाव घेतली असता कडूबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. सुरक्षारक्षकाने या अपघाताची माहिती तात्काळ जवाहरनगर पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कडूबाई यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.