औरंगाबाद - रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे घरी जाण्यासाठी रस्ता नाही, हा रस्ता मोकळा करण्यासाठी नागरिकांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न ( Mass Suicide Attempt in Aurangabad ) केला आहे. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना अडवत ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळाला.
अशी आहे घटना -
पैठण तालुक्यातील बिडकीनमधील बाजार तळाजवळ असलेल्या पद्मावती नगर येथे गेल्या अनेक वर्षपासून नागरी वसाहत आहे. तिथे बाजूलाच असलेल्या गट नं. 589 वर प्लॉटींग करून विक्री झाली आहे. त्यामध्ये 9 मीटर आणि 5 मीटर या रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याने, पद्मावती नगरमधील नागरिकांना येण्याजाण्यासाठी रस्ताची अडचण निर्माण झाली आहे. याबाबत नागरिकांनी संबधित विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याने या भागातील नागरिकांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.
नागरिक बसले खड्ड्यात -
गुरुवारी पद्मावती नगरच्या नागरिकांनी परिसरातील गणपती मंदिराच्या मोकळ्या जागेमध्ये मोठा खड्डा करून त्यात उतरून बसले. स्वतःला पुरून घेत आत्महत्या करण्याची तयारी केली. त्यावेळी पोलिसांनी खड्ड्यातून बाहेर काढत ताब्यात घेतले. बिडकीन पोलिसांनी खड्ड्यात उतरणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली आहे.