औरंगाबाद - विधानसभेच्या निडणुकीआधी अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, खालच्या पातळीवर देखील कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीत उमेदवारांची साथ सोडल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक राजकारण समोर ठेवून गावागावात आता पक्षांतराचे वारे वाहताना दिसत आहे. पैठण तालुक्यात देखील हेच चित्र पाहायला मिळत आहे.
शहरापेक्षा ग्रामीण भागात सध्या उमेदवाराच्या प्रचार बैठका, सभातून विकासाचा जाहीरनामा सक्षमपणे मतदारापुढे न मांडता विधानसभेचे उमेदवार एकमेकांचे उणे दुणे काढत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावात विधानसभेच्या अनुशंगाने मनोरंजनाचे कार्यक्रम असल्यासारखे वाटु लागल्याने, गटातटातील निष्ठावान लोक आता पक्ष बदलू लागले आहेत.
हेही वाचा - औरंगाबाद शहराच्या नावाला हात लावला तर याद राखा - अबू आझमी
नुकत्याच झालेल्या आपेगाव येथील राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यक्रमात माजी सरपंच आशोक औटे, भरत औटे यांच्यासह बऱ्याच कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत धनुष्य सोडून घड्याळ हाती बांधली आहे. त्यामुळे आता स्थानिक राजकारणातही बदलाचे वारे दिसून आले. तर नांदर येथील राष्ट्रवादीचे कट्टर नेते रेवन कर्डीले व मच्छींद्र मिसाळसह अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने खांदेपालपालटाच्या चर्चेला उधाण येत आहे.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये काँग्रेसला झटका; पश्चिम मतदारसंघातील उमेदवार रमेश गायकवाडांचा अर्ज बाद
कोणी पाण्याच्या मुद्द्यावर तर कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकमेकांवर आरोप करत पक्षांतर करत आहेत. त्यामुळे मतदारांना कोणता कार्यकर्ता कोणाचा प्रचार करतोय हे कळायला मार्ग नाही. अशा परिस्थितीत आता उमेदवारांना नेमके आपल्या सोबत कोण आणि विरोधात कोण आहे हा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा बंडखोरांमुळे चांगलीच चर्चेत राहत आहे हे नक्की.