औरंगाबाद : शेतकऱ्यांसाठी लवकरच मदत क्रमांक ( Helpline number for farmers ) अस्तित्वात येणार असल्याची माहिती परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी दिली. दोन महिन्यात टोल फ्री क्रमांक सुरू होईल, यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार असून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू होणार - शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी अनेक असतात. त्यावेळी नेमक काय करावे हे त्यांना कळत नाही. त्यात होणाऱ्या आत्महत्या पाहता ही हेल्पलाइन मदत करणारी असेल. शेतकऱ्यांनी आपली अडचण सांगितल्यास कृषी विद्यापीठातून त्यांना मार्गदर्शन केले जाईल. इतकेच नाही तर ते आमच्यापर्यंत किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवू शकतो. त्याचबरोबर शेती बियाणे यांची माहिती मिळेल. शिवाय त्यांना लागणारी सामग्री बाजारात उपलब्ध आहेत का? याबाबत त्यांना मार्गदर्शन केल्याने मदत होईल, अशी माहिती परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू होणार - सध्या वातावरणात मोठे बदल होत आहेत, त्याचा परिणाम पीकांवर होत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी विद्यापीठ आणि त्यांना सलग्न संस्थांमध्ये पिकांबाबत होणारे बदल त्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करणारे मदत केंद्र सुरू होईल असेही ते म्हणाले
शेतीमाल निर्यातीसाठी नवा अभ्यासक्रम - आजच्या जगात स्पर्धेत टिकणे गरजेचे आहे. त्यासाठी औरंगाबादेत नवे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. त्यामधे अग्री इंजनियरींग आणि अग्रो बिझनेस या अभ्यासक्रमाचा समावेश असेल. त्यामुळे पिकांची विक्री करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. विशेषतः निर्यात वाढवण्यासाठी काम केले जाईल. त्यासाठी उद्योजकांची मदत घेऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील अशी माहिती परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी दिली.