औरंगाबाद - गंगापूर येथे उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी येथील संजीवनी रुग्णालयामध्ये तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यमुनाबाई भड यांच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे त्यांचे निधन झाले. मात्र, योग्य उपचार न केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार करत नातेवाईकांनी लोकांना गोळा करून रुग्णालयावर हल्ला चढवला. हवा मारायचा पंप, लोखंडी रॉड, लाकडी दांडा व दगडाने रुग्णालयात घुसून डॉक्टर योगेश गवळी यांची कार, संगणक, एलसीडी, केबिनच्या काचा, काऊंटरवरील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. डॉक्टर गवळी व तेथील कर्मचारी तुषार राजपूत या दोघांना रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - अतीपावसामुळे टोमॅटोला काळे डाग, ६० टक्क्यांहून अधिकचे नुकसान
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी डॉक्टर योगेश गवळी यांच्या तक्रारीवरून गोपाळ भड, अनिकेत भड, ओम भड, सूरज यंदावत वक ऋषिकेश भड या पाच जणांविरुद्ध भादवि कलम 325, 307, 323, 504, 506, 143 ,147 ,149 ,269 270 भादवि कलम 4,6 महाराष्ट्र वैद्यकीय सेवा (हिंसक कृत्य) प्रतिबंध अधिनियम 2005 सह कलम महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन 2020 चे कलम 11, सहकलम 5,1 (ब) राजकीय आपत्ती व्यवस्थापन 2008 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिली.