औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावरील लिंबेजळगाव येथे दुचाकीवरून आलेल्या चार सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून कारमधील प्रवाशांना लुटले. एखाद्या चित्रपटातील घटनेप्रमाणे घडलेला हा थरार वाळूज परिसरातील लिंबे जळगाव या गावाजवळ बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडला. दरम्यान, या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिम येथील अक्षय वायचार हे पुणे येथे उच्चशिक्षण घेतात. ते दोघे भाऊ आणि एक मित्र असे चौघेजण पुणे येथून वाशिमला जात होते. दरम्यान हे चौघेही प्रवासी कार ( एमएच - 14 सीएक्स - 9240 ) मध्ये बसून जात होते. ते औरंगाबाद-नगर महामार्गावरील वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबे जळगाव जवळ येताच त्यांनी लघुशंकेसाठी कार थांबविली.
याचवेळी सीबीझेड या दुचाकी वाहनावरुन आलेल्या चार सशस्त्र दरोडेखोरांनी या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडील मोबाईल, रोख- रक्कम आणि चार चाकी कारही दरोडेखोरांन पळवली.
एखाद्या चित्रपटाप्रमाणे घडलेल्या या थरारक घटनेमध्ये दरोडेखोरांनी विरोध करणाऱ्या एका प्रवाशाच्या चेहऱ्यावर चाकूने वार केला. या घटनेतील दरोडेखोरांनी कारमधील कपडे आणि इतर साहित्य असलेल्या बॅगा येथून काही अंतरावर कारबाहेर फेकून दिल्या. त्यानंतर त्यांनी टेंभापुरी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने अंधारात पळ काढला. या दरोडेखोरांनी वाहन पळविल्याने या घटनेतील प्रवाशांनी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन, मारहाण करून मोबाईल, रोख-रक्कम आणि चार चाकी वाहन असा सुमारे दोन लाख 14 हजार रुपयांचा ऐवज पळविल्याची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी चारही अनोळखी दरोडेखोरांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर आणि वाळूज पोलीस ठाण्याच्या महिला फौजदार प्रीती फड आदींनी बुधवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास तरुणांची लुट झालेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
विशेष म्हणजे गत आठवड्यापासून वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनधारक आणि प्रवाशांना मारहाण करून लुटण्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्यामुळे वाळूज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सर्वसामान्यांकडून प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.